Sunday, May 26, 2019

पंतप्रधान मोदीजी स्वतःविषयी

माननीय पंतप्रधान मोदीजी स्वतःविषयी लिहीतात..

माझ्या लहानपणी आमचे आठ जणांचे कुटुंब ४०x१२ फुटांच्या घरात रहात असे. हे घर लहानच होते, परंतू ते गैरसोयीचे आहे असे आम्हाला कधीच वाटले नाही. आमचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होत असे, कारण त्यावेळी माझी आई लहान मुलांवर पारंपारिक उपचार करीत असे. त्यासाठी रात्री आळीपाळीने उठून आम्ही आईची चूल धुमसती ठेवत असू. शालेय शिक्षण घेण्याचे भाग्य तिच्या नशिबी नव्हते, पण ईश्वरकृपेने आजारी मुलांना बरे करण्याचा तिचा हातगुण असा विलक्षण होता की, आजारी मुलांना घेऊन आलेल्या आया बायांची रांग आमच्या घरापुढे रोज सकाळी लागत असे.

सकाळची ही गडबड संपल्यावर मी रेल्वे स्थानकावरील माझ्या वडिलांच्या चहाच्या दुकानाकडे धाव घेत असे. दुकान उघडून, साफ सफाई करून मी तसाच परस्पर शाळेत जात असे. शाळा सुटल्यावरही मी वडीलांना मदत करण्यासाठी तेथे जात असे. परंतु तेव्हा मात्र देशभरातून आलेल्या प्रवाशांच्या सहवासाचे आकर्षण जास्त असे. त्यांना चहा देता देता मी त्यांचे संभाषण ऐकत असे. त्यांच्या गप्पा ऐकून मी हिंदी भाषा बोलण्यास शिकलो. काही व्यापारी मुंबई शहराविषयी बोलत असत. आपणास ही स्वप्ननगरी कधी पहावयास मिळेल काय, असा विचार माझ्या मनात येत असे.

विद्यार्थीदशेतील चौकसबुद्धीला अनुसरून आमच्या शाळेच्या ग्रंथालयात जे जे काही हाती लागेल ते मी वाचत असे. वयाच्या ८व्या वर्षी मी सर्वप्रथम संघाच्या बैठकीस उपस्थित राहिलो. आपले जीवन हे आपल्या स्वतःसाठी नसून इतरांच्या भल्यासाठी आहे, हा पाठ मला तेथे मिळाला व पुढच्याच, म्हणजे ९व्या वर्षी गुजरात पूरग्रस्तांसाठी एक मदत केंद्र व अन्न वाटप केंद्र आम्ही मित्रांनी चालू केले. हे सर्व करण्यासाठीची संसाधने तुटपुंजी असल्याने इच्छा असूनही हे काम मी पुढे करू शकलो नाही.

ईश्वराने आपणा सर्वांना जगण्याचा एकसारखा हक्क बहाल केला आहे, अशी माझी धारणा त्या वयातही होती. मी कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे, सभोवतालची परिस्थिती काय आहे, याचा विचार न करता मला या सर्वातूनच मार्ग काढून मोठे व्हायचे आहे हा ध्यास मनात होता. आमच्या कुटुंबाची परिस्थिती अतीसामान्य होती, चैन काय असते हे मला ठाऊकच नव्हते व चांगले आयुष्य म्हणजे काय असते, हे ही मी कधीच पाहिले नव्हते. पण तरी त्यावेळच्या माझ्या त्या छोट्या जगातील आयुष्यात मी समाधानी होतो. जीवनात संघर्ष होता, पण त्या संघर्षाची जाणीव मात्र त्या वयात नव्हती.

परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यावर मात कशी करायची याचे मार्ग मी शोधले होते. आपण नीटनेटके व व्यवस्थित असण्यास हवे, ही भावना त्याही परिस्थितीत मनात होती. इस्त्री घेणे परवडण्यासारखे नव्हते. मग एका तांब्यात चुलीतील निखारे घालून त्याला फडके गुंडाळून गणवेश व इतर कपडे इस्त्री करण्याचे तंत्र मी आत्मसात केले. या देशी इस्त्रीने कपडे तितकेच नीटनेटके दिसत असतील तर तक्रार का करायची व परिस्थितीला दोष का द्यायचा ?

मी आज जो काही आहे, त्याची बीजे माझ्या त्या बालपणातील प्रतिकूल परिस्थितीत आहेत. ही जाणीव अर्थातच त्या वेळी मनात नव्हती, कारण ते वयच असे असते की, सुखे व दुःखे चटकन विसरली जावीत ! चहाच्या दुकानात वडिलांना मदत करत, प्रवाशांना चहा विकण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदी या ८ वर्षाच्या मुलाला कोणी विचारले असते की, भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न तुझ्या मनात आहे का, तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच आले असते. तसा विचार करणेही दुरापास्त होते.

त्या वाढत्या वयात माझ्या मनात अमाप कुतुहूल होते, पण विचारांची दिशा स्पष्ट नव्हती. गणवेशातील सैनिक पाहून देशसेवा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे मला वाटत असे. रेल्वे स्थानकावर साधुसंतांशी माझे बोलणे जसे वाढत गेले, तसे त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन व त्यांची जीवनपद्धती याविषयी उत्सुकता वाढत गेली.

अशीच काही वर्षे गेली. योग्य मार्गदर्शनाअभावी त्यावेळचे माझे जीवन दिशाही, संभ्रमित होते. मला काहीतरी करायचे आहे, पण  काय करायचे आहे व ते का करायचे आहे, त्यासाठी मला कोठे जायचे आहे, हे माहित नव्हते. अशा मनःस्थितीत मी परमेश्वराला शरण गेलो व वयाच्या १७व्या वर्षी आई वडीलांचा आशीर्वाद घेऊन मी हिमालयाचा रस्ता धरला.

दैवावर भरवंसा ठेऊन मी हिमालयात भटकंती केली. या भटकंतीतून काही प्राप्त करण्याचे माझ्या मनात नव्हते, पण तरीही माझ्या मनातील बऱ्याच शंकाकुशंकांची उत्तरे मला मिळाली. मला या जगाचा व माझ्या स्वतःचा शोध घेता आला. हिमालयात मी खूप प्रवास केला, रामकृष्ण मिशन मध्ये काही काळ व्यतीत केला. साधू संतांच्या सानिध्यात राहून अंतर्मनाचा शोध घेतला. विविध स्थळांना भेटी दिल्या.

या दरम्यान मी ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे ३ ते ३.४५ च्या दरम्यान जागा होत असे व हिमालयातील रक्त गोठविणाऱ्या गार पाण्याने स्नान करत असे. खळाळणाऱ्या एखाद्या धबधब्याच्या आवाजात ध्यानाद्वारे शांतता व ऐक्यभाव याची अनुभूती घेण्यास मी शिकलो. ज्या साधूंच्या सानिध्यात मी राहिलो, त्यांनी मला या विश्वाशी एकतानता कशी साधावी याचे शिक्षण दिले.

मला पुढच्या आयुष्यात ही विलक्षण एकतानता आजवर सहाय्यभूत झाली आहे. मला एक जाणवले की, आपल्या विचारांना काही मर्यादा आहेत. मनात शरणागतीचा भाव ठेऊन तुम्ही जेव्हा अनंतासमोर जाता, तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही या अथांग विश्वाचा एक भाग आहात. ही जाणीव झाल्यावर तुमच्या मनातील अहंकार गळून पडतो व तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरवात होते.
त्या दरम्यान माझ्यात हे संक्रमण झाले. दोन वर्षांनंतर मनाची सुस्पष्टता व मार्गदर्शक उर्जा मनात घेऊन मी घरी परतलो.

हिमालयातून परत आल्यावर आपले उर्वरीत जीवन हे जनसेवेसाठी आहे हे मला उमगले. परत आल्यावर मी लगेच अहमदाबादला गेलो. मोठ्या शहरात रहाण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग होता – तेथे जीवनाची गती विलक्षणच होती. मी माझ्या काकांना त्यांच्या उपहारगृहात मदतनीस म्हणून तेथे कामास सुरवात केली.

त्यानंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ प्रचारक झालो. तेथे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटण्याची व विविध प्रकारची कामे करण्याची संधी मला मिळाली. संघाच्या शाखेच्या कार्यालयाची साफसफाई करणे, स्वयंसेवकांसाठी चहा करणे, अन्न शिजविणे आणि भांडी साफ करणे अशी कामे आम्ही स्वयंसेवक आळीपाळीने करत असू.

तेथील जीवनक्रम खूपच दगदगीचा व व्यस्त होता. तरीही त्या तशा धावपळीत हिमालयातील माझ्या वास्तव्याने मला जी शिकवण दिली होती ती मी विसरलो नाही. तेथील वास्तव्यात मला मनःशांतीची जी अनुभूती आली होती, ती या नव्या जीवनक्रमात हरवून जाऊ नये यासाठी दरवर्षी काही काळ अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याचे मी ठरविले. संतुलीत जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे असे मला जाणवले.

फार कमी लोकांना हे माहित आहे की दरवर्षी दिवाळीच्या पाच दिवसात मी सर्वापासून दूर, जंगलात जात असे व तेथील निर्मनुष्य परिसर, स्वच्छ पाणी अनुभवत असे. पाच दिवस पुरेल इतकी शिदोरी मी बरोबर घेत असे. तेथे आकाशवाणी किंवा रेडीयो नसे, वृत्तपत्र नसे. दूरदर्शन व इंटरनेट तर नव्हतेच. या वनवासातील आत्मचिंतनातून मला जी उर्जा मिळाली आहे ती आजवर मला माझ्या जीवनकलहात उपयोगी पडली आहे. तेव्हा अनेक लोक मला विचारत – तू तिथे जाऊन कोणाला भेटतोस ? काय करतोस ? मी उत्तर देत असे – मी तिथे मला स्वतःलाच भेटण्यास जातो !

म्हणून मी सर्वांना, विशेषतः माझ्या तरुण मित्रांना नेहमी सांगतो की, तुमच्या व्यस्त दिनक्रमातून व धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून जरा आत्मपरीक्षण करा. त्याने तुमचा दृष्टीकोन सकारात्मक होऊन तुम्हालाच तुमची नवी ओळख होईल. तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगू लागाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल व लोकांच्या बऱ्यावाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला शक्य होईल. या सर्वाचा तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोग होईल. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्यामध्ये काही वेगळेपण असून आपण स्वयंप्रकाशी आहोत, त्यासाठी आपल्याला बाहेर पहाण्याची गरज नाही !!!

No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...